सावली अध्याय १३ वा

।। श्री ।।
।। अथ त्रयोदशोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

श्रोते मज सांगती । कीं आमुची न झाली तृप्ति । अधिक सांगावी महती । जानकीची आम्हांला ।। १ ।।

जरी देवास म्हणती करुणाकर । तरी आम्हांस वाटला निष्ठुर । संत जानकीला सत्वर । काय म्हणून नेलें त्यानें ।। २ ।।

लुळे पांगळे उगाच जगती । धरणीला भार मात्र होती । कुष्टी, वृद्ध तडफडती । मरणासाठीं आतुरलेले ।। ३ ।।

कांहीं पडती खितपत । नजर मरणमार्गीं लावीत । वाट सुटकेची पाहत । पण मिळे तयां दीर्घायुष्य ।। ४ ।।

परी ज्यांना वाटे जगावें । जनां मार्गदर्शन करावें । परंतु देवाला तेची प्रिय वाटावे । ह्याचें नवल वाटतें ।। ५ ।।

जे लोकांना वाटती हवे । त्यांना लौकर उचलावें । देवांना वाटती हेवे । ऐशा संतजनांचे ।। ६ ।।

मोठे मोठे साधूसंत । अथवा नेतेपदा जे भूषवित । ज्यांची उणीव भासते जनांत । ते अल्पायुषी कां व्हावे ? ।। ७ ।।

यांत कोणते शहाणपण । अथवा काय साधितो कल्याण । करित नाहीं का तो अकल्याण । सकल भक्त जनांचें ? ।। ८ ।।

जानकीला न्यावें आमच्यांतून । हें देवाचें नच भूषण । वाटे हा कसा दयाघन । आग पाखडती भक्तांवर ।। ९ ।।

हृदय श्रोत्यांचे हेलावलें । लोचन भक्तीनें पाणावले । सांग पुढें म्हणूनी वदले । गहींवरून मजला ते ।। १० ।।

रोष मनांतला ओळखून । मी भावार्थ घेतला जाणून । तुम्हां न पटलें इहलोकांतून । जाणें तिचे होय ना ? ।। ११ ।।

परी संसार आहे क्षणभंगुर । उत्पन्न होऊन नष्ट होणार । नष्ट होऊनी पुन: उत्पन्न होणार । केवळ परमेश्वराच्या इच्छेनें ।। १२ ।।

त्याची इच्छा न जाणली कोणीं । अकर्तेपणीं कर्तेपण घेऊनि । सर्व सूत्रें हातीं ठेवूनी । सर्व जीवांना तो खेळवितो ।। १३ ।।

ते जीव सर्व येती एकत्र । माता, पिता, पत्नी पुत्र । अथवा सखे सोयरे मित्र । बनोनियां वावरती ।। १४ ।।

कर्मानुभवें एकत्र येती । एकमेकां प्रेमें भेटती । अथवा हेवे दावे साधिती । मनुष्यजन्मा येऊनि ।। १५ ।।

कोणी कधी जन्मावें । कोणी कधी मरावें । हें एकची त्याला ठावें । सर्व चालवितसे स्वेच्छेने ।। १६ ।।

स्वतंत्र कर्म आचरण्याला । स्वातंत्र्य दिलें मानवाला । परि कर्मफल मात्र त्याला । श्रीइच्छेनें मिळतसे ।। १७ ।।

जीव करितो पाप पुण्य । तैसें लाभतें त्याला जीवन । संत भेटून मार्गदर्शन । जीवमात्रांना करितात ।। १८ ।।

वाटाड्यास बोट दाखवून । तुम्हीं जैसे जातां निघून । त्याचि मार्गे तो जाऊन । इच्छित स्थळी पोंहचत असे ।। १९ ।।

तैसेची असती संतजन । बोट दाखवूनी जाती निघोन । आपण करावें मार्गगमन । संत कथीत मार्गानें ।। २० ।।

जरी मनांत येईल शंका । तरी प्रसंग येईल बांका । मार्ग अव्हेरून धोका । जीवनांत पत्करू नका ।। २१ ।।

संत दाखविती जी वाट । ती निष्ठेनें चालावी नीट । कंटक लागले मार्गांत । तरी विचलित न व्हावें ।। २२ ।।

दृढ श्रद्धा असेल अंतरीं । तों देव न राहूं शके दूरी । तो जागृत हृदयांतरी । सुभक्ताच्या राहतसे ।। २३ ।।

तैसीच कथा जानकीची । भक्त हृदयीं वास्तव्यांची । गरज न राहे स्वदेहाची । अनेक देहांच्या स्वामिनीला ।। २४ ।।

जो हांक प्रेमानें मारील । जानकी त्याचें सन्मुख येईल । भक्त इच्छित पुरवील । जो जें वाछील तें तें ।। २५ ।।

असो, एक सुभक्त रोहिणी । खोपकर नामें सद्गुणी । सर्व जीवन जानकीवरी । समर्पून राहतसे ।। २६ ।।

समोर तिचा फोटो ठेवून । ती प्रत्यक्ष बैसलीसे मानून । गोष्टी प्रेमळ करितसे । विनवूनि अति नम्रपणें ।। २७ ।।

जें दिवसा लागीं घडावें । तें आई बाईस सांगावें । ऐशा भाबडेपणे करावें । नि:स्वार्थी प्रेम आईवरी ।। २८ ।।

काम करितां करितां घरांत । फोटोसंगे राही बोलत । परक्यास वाटे गंमत । बडबड एकटीची ऐकून ।। २९ ।।

कोणी सहज विचारीत । कोणा संगे होतीस बोलत । तों आईबाई असे संगत । बोलतें म्हणून सांगतसे ।। ३० ।।

इतरांना तो फोटो वाटत । परि तिज आई बैसलेली भासत । म्हणे सर्व आहे न्याहाळित । माझे व्यवहार प्रत्यक्ष ।। ३१ ।।

तिचा सुपुत्र धनंजय । सात वर्षांचे असतां वय । त्याचा भाजलासे पाय । खेळत असतां घरांत ।। ३२ ।।

भात ठेवला होता शिजत । त्यांत पाणी होतें उकळत । बाळ गेला खेळत खेळत । भांडे पडलें पायावरी ।। ३३ ।।

तेव्हां धनंजय किंचाळला । तों माय धावली पहावयाला । भात उकळतां सांडला । पायावरी तयाच्या ।। ३४ ।।

धस्स जाहलें मनांत । तैसेची त्याला उचलीत । नळाजवळी नेत । पाय धुतलासे पाण्यानें ।। ३५ ।।

मनांत होती बडबडत । काय आईबाई होती करत । लक्ष न बाळाकडे देत । अडविलें कां न त्याला ।। ३६ ।।

प्रत्यक्ष असतां घरांत । मी निश्चिंत असतें मनांत । संसार चाले सुरळीत । केवळ तुझ्या कृपेने ।। ३७ ।।

आज कोठें होतीस गेली । बाळास केलें तुझ्या हवाली । म्हणोनियां कामास लागलें । दुसरीकडे आज मी ।। ३८ ।।

बाळ खेळता स्वयंपाकघरांत । तुवां कां न अडविला हात । आतां मायेचा फिरवोनी हात । संरक्षावें गे बाळाला ।। ३९ ।।

बाळास घेऊनियां आली । नम्रतेनें फोटो जवळी बैसली । कुंकु लाविले पदतलीं । नांव तिचें घेऊनियां ।। ४० ।।

जानकी हंसली मनांतून । भाव तिचा ओळखून । धनंजयास घेतलें सांभाळून । पायास जखम न झाली ।। ४१ ।।

कुंकवाने माखला पाय । तोचि अक्षय ठरला उपाय । डॉक्टरकडेही न जाय । जखम त्वरीत वाळलीसे ।। ४२ ।।

ऐसेंच एकदां रोहिणीला । त्रास गळ्याचा जाहला । म्हणोनि दाखवी डॉक्टरला । उपाय करण्या कारणें ।। ४३ ।।

डॉक्टर म्हणती गळ्यांत । गांठ जाहलीसे वाटत । काढावी लागले त्वरित । शस्त्रक्रिया करून ।। ४४ ।।

डॉक्टर उपाय सांगती । परि खर्चाची वाटे भीति । पैशाची सवड नव्हती । मध्यम स्थिती म्हणोनियां ।। ४५ ।।

तेव्हां आईबाईस विनवीत । की पैसा नसतां हातांत । कैसा उपाय करावा त्वरित । जरी दुखणे सांगती गंभीर ।। ४६ ।।

तुझ्या काय आहे मनांत । की मी दु:ख भोगावे गळ्यांत । अन्नपाण्याविना राहत । त्याची तमा नसे तुजला ।। ४७ ।।

तुझ्या नांवाचें औषध । मज एकच माहित । आम्हां गरिबांचे जीवित । चालते केवळ श्रद्धेवर ।। ४८ ।।

जैसे तुझ्या मनात येइल । तैसे श्रद्धेचे द्यावे मोल । आई पदराखाली घेईल । दृढ श्रद्धा अंतरि ।। ४९ ।।

कुंकू लाविले गळ्यावरून । आईबाईचे नाव घेऊन । ऐसे कांहीं दिवसा लागून । बरे वाटू लागले रोहिणीला ।। ५० ।।

भीति घातली होती म्हणून । वाटे एकदां यावें दाखवून । डॉक्टर पाहती तपासून । तों गाठ तेथे नव्हतीच ।। ५१ ।।

आश्चर्याने पाही डॉक्टर । म्हणे कैसा घडला चमत्कार । मला निश्चित वाटला कॅन्सर । आहे तुमच्या गळ्यांत ।। ५२ ।।

जी गाठ हाताला लागली । त्यावरून तशी कल्पना केली । परि आज ती नसे उरली । भाग्यवान दिसता तुम्ही ।। ५३ ।।

डॉक्टरचा निर्णय ऐकून । रोहिणी जाई आनंदून । कृतज्ञतेने नयन भरून । आले तिचे तेधवां ।। ५४ ।।

घरीं आली धांवत । आईबाईला सांगत । मज केलेस दु:खमुक्त । किती अपार प्रेम मजवरी ।। ५५ ।।

तिचे पती चंद्रकांत । जानकीचे निस्सीम भक्त । नोकरी करिती स्टुडियोंत । जानकीच्या कृपेने ।। ५६ ।।

फोटो काढावया कारण । फिरावें लागे सर्वत्र जाण । सायकलीवरी अवलंबून । नोकरी होती तयांची ।। ५७ ।।

ऐशाच कामाकरितां म्हणून । सायकल रस्त्याशी ठेवून । फोटो काढून येती परतून । तो ती न दिसे जागेवर ।। ५८ ।।

मनांत जाती घावरून । सर्वत्र पाहती शोधून । सायकल हरवली म्हणून । पोलिसांत नोंदविली ।।५९ ।।

नैराश्यें येती परतून । पत्नीस सांगती वर्तमान । आतां पदयात्रा करून । नोकरी करावी लागेल ।। ६० ।।

नित्य जावें लागे दूर । तरी निघणें आलें लौकर । अवलंबून राही व्यवहार । बस गाडीवर माझा ।। ६१ ।।

जरी सायकल घ्यावी विकत । तरी सवड नाहीं निश्चित । अपार केल्याविना कष्ट । मार्ग नाही मजला ।। ६२ ।।

ऐशा विषण्ण मन:स्थितीत । आईबाईस विनवीत । आपुली सायकल गेली चोरीस । काय करावें कळेना ।। ६३ ।।

जैसे तुझे येईल मनांत । तैसें करावें तूं निश्चित । मी शांत राहीन मनांत । काळजी वाहिली चरणीं तुझ्या ।। ६४ ।।

ऐसे काहीं दिवस गेले । पोलिसांतून काहीं न कळलें । मात्र एका रात्रीं स्वप्न पडलें । चंद्रकांतला तेधवां ।। ६५ ।।

मध्यरात्रीला हलवून । त्यास कोणी सांगे जागवून । चंद्रकांता उठ ! म्हणून । सायकल आणावी आपली ।। ६६ ।।

ऐसा ऐसा मार्ग क्रमून । तुवां जावें रस्त्यावरून । तेथें सायकल येईल दिसून । त्वरित यावें ती घेऊन ।। ६७ ।।

प्रथम भास वाटला म्हणून । तो परत जाई झोंपून । परी पुन्हां त्यास हलवून । जागें करितसे माऊली ।। ६८ ।।

तेव्हां उठला झोंपेतून । जाई दाखविलेल्या मार्गावरून । तो रस्त्याला लागुन । सायकल दिसली तयाला ।। ६९ ।।

नीट पाही तपासून । तो ओळख आली पटून । कोणी जवळ नाही पाहुन । घेऊन आला घरीं तो ।। ७० ।।

आईबाईस करी वंदन । अपार कृपा जाणून । आपण त्रास दिला म्हणून । क्षमा मागे चरणांशी ।। ७१ ।।

त्याची अपार श्रद्धा पाहून । जानकीस यावें लागे धावून । नित्य घेई सांभाळून । पदोपदीं संसारांत ।। ७२ ।।

स्टुडीयोंत ज्या काम करिती । तेथें वातानुकूल निर्मिती । चंद्रकांताला तेथे नेमती । कार्य कराया चांगलें ।। ७३ ।।

एकदां कामाचे असता घाईत । सायंकाळीं निघतीं गडबडींत । पाऊणवाटेवरी येत । तोंच स्मरलें तयांना ।। ७४ ।।

निघतांना खोलीमधून । बंद न केलें बटण । वातानुकूलचे मशीन । चालूच राहिलें असे कीं ।। ७५ ।।

वाटे परत फिरावें आपण । पाऊणवाट आलों चालून । घराची ओढ लागे म्हणून । कंटाळा करिती जाण्याचा ।। ७६ ।।

तैसेची शिरती घरांत । आईबाईस नमस्कारित । फोटो समोरी सांगत । मोठ्या आत्मविश्वासानें ।। ७७ ।।

मी बंद न केलें बटण । तेणें चालूच राहिलें मशीन । तुवां तेवढें बंद करून । घ्यावें केवळ मजसाठीं ।। ७८ ।।

ऐसें ते असतां विनवीत । तो रोहिणी आली धांवत । कारण काय विचारीत । येतांच धावलांत आईपाशी ।। ७९ ।।

तेव्हां ते सांगती हकिकत । कीं घरीं येण्याचे घाईत । बंद करण्याचें विसरीत । बटण वातानुककूलाचें ।। ८० ।।

येतां ‘वाटेवर पाऊण’ । तेव्हां जाहलें कीं स्मरण । बंद न केलें मशीन । घाम फुटला अंतरीं ।। ८१ ।।

परत फिरावें माघारी । तों थकून गेलो शरीरीं । तेणें येऊनियां घरीं । विनंती केली माऊलीला ।। ८२ ।।

आतां बंद झालें असेल । तेवढे काम ती करील । माझी चिंता निवारील । काळजी नसावी मनांत ।। ८३ ।।

रोहिणी गेली घाबरून । पुढील चित्र दिसलें भयाण । जरी न जाहलें बंद मशीन । आग स्टुडीयोला लागेल ।। ८४ ।।

वातानुकूल करण्याकरितां । बराच खर्च केला होता । केवळ चंद्रकांता करितां । स्टुडीयोच्या त्या मालकानें ।। ८५ ।।

जरी घडून आले विपरीत । दूषण लागेल दैवांत । नोकरीवरी आपत्ती येत । केवळ निष्काळजीपणामुळें ।। ८६ ।।

तेव्हां ती पतीस विनवीत । कीं परत जावें स्टुडीयोंत । बंद करूनी यावें परत । अनर्थ हा टाळावा ।। ८७ ।।

अथवा करोनियां फोन । विचारून घ्यावें लक्षण । परी आतां कोणीही नसेल म्हणून । प्रश्न पडलां तयांना ।। ८८ ।।

तो निश्चिंत होता मनांत । परी पत्नी स्वस्थ बसूं न देत । सारखी पिच्छा होती पुरवीत । जावें अथवा विचारावें ।। ८९ ।।

शेवटी तिच्यास्तव उठला । फोन करावयास गेला । एका सहकार्यास केला । स्टुडीयोजवळ रहाणार्या ।। ९० ।।

कैसी स्टुडीयोची आहे स्थिती । तुवां पहावी प्रत्यक्ष ती । कृपया घ्यावी तसदी । मजकरितां येवढी ।। ९१ ।।

तेव्हां तो सांगूं लागला । कीं मी सहज गेलों त्या बाजूला । तों बातानुकूल चालू दिसला । म्हणोनि बंद केला असे ।। ९२ ।।

चिंतेचा उतरला भार । त्याचे मानोनिया आभार । सत्वर गाठलें घर । पत्नीस सांगावया ।। ९३ ।।

म्हणे तुज होतो मी सांगत । तैसेची घडले सांप्रत । आई कोणा बुद्धी देत । सहज तेथें जाण्याची ।। ९४ ।।

ज्याला मी केला असे फोन । तो स्वत:च आला जाऊन । बंद करोनियां मशीन । सांगत होता मजला तो ।। ९५ ।।

जरी सख्य नव्हते उभयतांत । त्यालाच आई बुद्धी देत । त्याचे करी कार्य करवीत । जाहलीसे माऊली ।। ९६ ।।

दोघेही जाती आनंदून । आईबाईस करिती वंदन । किती काळजी वाहते म्हणून । बाळाची ती आपुल्या ।। ९७ ।।

ऐसे हे पतीपत्नी दोघेजण । निस्सीम भक्तीचे उदाहरण । त्यांचे प्रेमास भुलून । जात असे माऊली ।। ९८ ।।

एका माऊलीवाचून । ते न जाणती अन्य कोण । तिचे पायीं चिंता वाहून । निश्चिंत राहती संसारीं ।। ९९ ।।

त्यांना न वाटे अडचण । जानकी न दिसे म्हणून । सर्वव्यापकत्व आलें कळून । मृत्यु नंतर तियेचें ।। १०० ।।

पूर्वी होती देह रूपांत । तेव्हां दर्शन लाभ असे घडत । आतां असतां विदेहांत । फोटोअंतरीं पाहती ।। १०१ ।।

संसाराचें सुख दु:ख । आईबाईस सांगत । तिचें नावें कुंकू लावित । विश्वासून अंतरीं ।। १०२ ।।

म्हणोनियां श्रोतेजन । ध्यानीं घ्यावें सुभक्त लक्षण । जानकी न दिसे म्हणून । निराश न व्हावें अंतरीं ।। १०३ ।।

प्रेम असेल अपार । तर सर्वत्र दिसेल परमेश्वर । तो सुभक्तास करील पार । भवभयापासूनि ।। १०४ ।।

मीरेची मधुर भक्ती । राधेची श्रीकृष्णप्रीति । हनुमंताची दास्यभक्ति । हृदयांतरी जाणवावीं ।। १०५ ।।

जानकी प्रेमाची भुकेली । त्यालाच ती प्रसन्न झाली सर्वस्वी त्याचीच झाली । जो निरंतर घेई नाम ।। १०६ ।।

ऐसे वागतां भक्तजन । कैसें भासावें उणेपण । ज्ञानचक्षु पहावें उघडोन । सर्वत्र दिसेल जानकी ।। १०७ ।।

जेथें चालेल गुणगान । तेथें ती राहील निष्ठून । संत देवापरी होऊन । भक्तजनां सांभाळिती ।। १०८।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम त्रयोदशोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*