।। श्री ।।
।। अथ द्वितीयोऽध्याय: ।।
श्रीगणेशाय नम: ।
श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: ।
श्रीगुरुभ्यो नम: ।।
ऐशा या मालुस्ते गांवांत । दुर्गा वाढे बालपणांत ।
हळूहळू येई यौवनांत ।चिंता उद्भवली अजोबांना ।। १ ।।
परिस्थिती केवळ गरिबीची । अठराविश्वे दारिद्र्याची ।
चिंता संपता आजची । उद्यांची उद्भवे त्वरित ।। २ ।।
कष्ट करिती अपार । तेव्हां कोठे दिसे भाकर ।
अथवा चणे-मुरमुर्यांवर । दिन काढावे कधीं कधीं ।। ३ ।।
जिणे नित्याचे रोजीवर । लाकूडतोड्याचे धंद्यावर ।
कित्येक दिवस उपवासावर । दैवाचे भरंवशावर काढीती ।।४ ।।
धुणी-भांडी घासोनी । पाणी भरी कोसावरुनी ।
कांटे पायांत मोडुनी । दुर्गा कष्टतसे घरांत ।। ५ ।।
लाज राखण्यापुरतें । एकच वस्त्र अंगाभोवतें ।
एकही इच्छेची न होती पूर्ती । केवळ दारिद्र्यामुळें ।। ६ ।।
ऐंसी असता परिस्थिती । लग्नानें उपजे भीती ।
कोणा भाग्यवंता हाती । दुर्गा द्यावी कळेना ।। ७।।
आजोबांचे येई ध्यानांत । कीं दुर्गा आहे भाग्यवंत ।
तिचे अनुभव घेता लक्षांत । कंठ दाटें तयांचा ।। ८ ।।
डोळां आणोनिया पाणी । म्हणें देवा काय तुझी करणी ।
माझे सौभाग्य म्हणूनी । हिरकणी दिलीस पोसाया ।। ९ ।।
दुर्गेला होत्या बंधु-भगिनी । त्याही नेल्या आप्तांनी ।
आई नव्हती म्हणूनी । ऐसी पांगली भावंडे ।। १० ।।
काय आहे तुझ्या मनांत । की दुर्गेनें जगावे दारिद्र्यात ।
मुलांची केली वाताहात । काय केंलेस देवां तूं ? ।। ११ ।।
ऐसें गहिंवरता त्यांचे मन । तोंच दुर्गेचें स्मरलें संभाषण ।
मी देवींच्या संगे राहून । बहुत दिन खेळलें ।। १२ ।।
खूप खूप होतें आनंदात । वाटे न जावें कधींही परत ।
स्वर्ग सुखाच्या सौख्यांत । रममाण व्हावें सदैव ।। १३ ।।
ओठी लावलें अमृताचें बोट । आणि येथे चाटते शुष्क ओठ ।
तुझी कैसी करणी अघटित । निष्ठुर माया कळेना ।। १४ ।।
संत सखु आणि बहिणा । संत मुक्ता आणि जना ।
दारिद्र्याच्या भोगती यातना । मग दुर्गेचा काय पाड ? ।। १५ ।।
ऐसा करित असतां विचार । आजोबांना दिसे एक वर ।
जरी होता मोठा बिजवर । वाटे मुक्त व्हावे कन्यादानें ।। १६ ।।
नाडसुरचे सुळे-देशमुख । शांताराम नांवे कुटुंबात ।
स्वयें मागणी असे घालीत । दुर्गेला द्यावी म्हणोनियां ।। १७ ।।
ऐसी संधी येता चालत । कार्यही करिती त्वरीत ।
आणि गंगासिंधूला मिळत । चंद्र-सूर्याच्या साक्षीनें ।। १८ ।।
दुर्गेची जानकी जाहली । कळी संसारी झेपावली
उमलोनी प्रसन्न फुलली । संसार नेटका करावया ।। १९ ।।
शांताराम होते पति । परी स्वभावांत नव्हती शांती ।
होती कोपिष्ट प्रवृत्ती । जमदग्नी वाटती दुजे कीं ।। २० ।।
वरी दुर्गा होती शांत । तिला कळलें कीं वृत्त ।
पहिल्या पत्नीसी त्यजित पतिदेव आपुले ।। २१ ।।
विरहाचें दु:ख जाणून । सवतीला आणावें म्हणून ।
पतिदेवास घाली आण । वारंवार पायाशीं ।। २२ ।।
परी कधी ते न ऐकत । वरी अधिकची ते कोपित ।
जानकी मात्र शांत । सोशीतसे सर्व तें ।। २३ ।।
वरी गरिबी होती संसारी । त्यांत पतीस नव्हती नोकरी ।
चिंता जाळीतसे उरीं । वाढत्या संसाराची ।। २४ ।।
महाराष्ट्र सोडूनी निघती । गुजराथेंत येऊनी पाहती ।
‘गणदेवीस’ येऊनी राहती । कौल दैवाचा घ्यावया ।। २५ ।।
येथें दैवानें दिली साथ । कामधंदाही लाभत ।
परि तलाठीचे नोकरींत । जम बैसलासे थोडासा ।। २६ ।।
परि जे काहीं होतें मिळत । त्यांत संसारही नव्हता
भागत । कारण आप्त होते बहुत । अवलंबून त्यांचेवरी ।। २७ ।।
वाटे दारिद्र्याने केली संगत । जानकीच्या याही संसारात ।
उपवास काढती बहुत । चित्तीं समाधान ठेऊनियां ।। २८ ।।
दादा मात्र वैतागती । परि जानकीची न ढळें शांती ।
माया-ममता-प्रीती । स्वजनांवरी करितसे ।। २९ ।।
तिच्या कष्टास नव्हती क्षीती । पाण्यास जावें नदीवरती ।
कोसावरून येता टरटरती । पाय कोवळ्या जानकीचे ।। ३० ।।
कित्येक वर्षांपर्यंत । एकच लुगडे होत्या नेसत ।
अर्धे धुवूनियां घालत । अंगावरीच आपुल्या ।। ३१ ।।
जाऊनी शिंप्याचे दुकानांत । चिंध्या गोळा असती करीत ।
ठिगळांची करूनियां घालित । चोळी अंगावरी आपुल्या ।। ३२ ।।
जानकी जें जगली जीवन । तें कारुण्याचें दारुणपण ।
ऐकता द्रवेल पाषाण । शब्द थिटे वर्णावया ।। ३३ ।।
जानकीची नणंद निवर्तली । तिचीं मुलें येथेच आणिली ।
वरी जानकी जाहली लेकुरवाळी । नांदे गोकुळ संसारी ।। ३४ ।।
अपार कष्टाने संसारी । जानकी पडतसे आजारी ।
दादा संतापती वरचेवरी । परी उपाय काय कळेना । ।। ३५ ।।
जानकी खिळली अंथरुणावर । हटे न देहांतून ज्वर ।
आतां मात्र देवावर । सर्व भरंवसा टाकीती ।। ३६ ।।
जानकीचे कळता वृत्त । चंपूमावशी येती धांवत ।
तिज पाहतां बोलत । उठ उठ चंपावती ।। ३७ ।।
अरे हिला न कोणता आजार । देहीं चंपावतीचा संचार ।
सुखें कराया व्यवहार । मोकळ्या मनाने संसारी ।। ३८ ।।
जानकी उठून बैसली । आनंदाने बहुत घुमली ।
ओळख ऐसी पटली । हर्ष झाला म्हणोनियां । । ३९ ।।
मात्र या दिवसानंतर । चक्रें दैवाची फिरत ।
आणि अभ्युदयाकडे वळत । हळू हळू ती कुटुंबांची ।। ४० ।।
आता दादांचाही चांगला । वाहन दलाली धंदा जमला ।
शेतीचा तुकडाही घेतला । संसार चाले नेटका ।। ४१ ।।
घरात नांदे गोकुळ । घरीं पाहुण्यांची वाढें वर्दळ ।
माया दाखवी आपुला खेळ । लाज राखे संसाराची ।। ४२ ।।
कधी येता मित्र-परिवार । पीठही नसतां चिमूटभर ।
कैसी द्यावी भाकर । प्रश्न पडे मुलींना ।। ४३ ।।
कोंडा घेऊनि चाळणींत । जानकी बसे मुलीसंगत ।
गीतें ओव्या गात गात । हात चाळा करितसे ।। ४४ ।।
पाहतां पाहतां चाळणीतून । पीठ निघे झरझरुन ।
सर्व जाती आनंदून । आश्चर्य करितीं मनोमनीं ।। ४५ ।।
आता मात्र जानकीवर । देवीचा राहे अभयकर ।
संसाराचा सर्व भार । चिंता शिरीं ती वाहतसे ।। ४६ ।।
थोडे येता चांगले दिन । दादा आणती घडवून ।
सोन्याच्या पाटल्या म्हणून । जानकीकरीं घालावया ।। ४७ ।।
तिच्या जीवनांत पहिली । ऐसी सुवर्णसंधी लाभली ।
ती सहज हांसून बोलली । कांकणदिन किती राहतील ।। ४८ ।।
दादा जाती संतापून । म्हणे अभद्र बोले भाषण ।
परी वेळीच आले कळून । सस्मित हास्य पत्नीचें ।। ४९ ।।
दरुवाड्यांत लाभले । प्रशस्त जागा असलेलें ।
घर कौलारु चांगले । पाटल्या विकून घेतले ।। ५० ।।
जरी होतें तें प्रशस्त सुंदर । तरी न राहती सहोदर ।
कारण होता भुतांचा वावर । सभोंवतालीं घराच्या ।। ५१ ।।
राजपूतांची होती वस्ती । ज्यांचे पूर्वज युद्धांत मरती ।
ते मृतात्मे तेथें वावरती । धिंगाणा करिती बहुत ।। ५२ ।।
दादा जातीं रहावयाला । परी त्रास भुतांचा वाढला ।
आजार वेगळाची चालला । घरामाजी तयांच्या ।। ५३ ।।
युद्धांत लुटली जी संपत्ती । ती घरांत पुरली होती ।
त्यावरीं सर्प भुजंगांची वस्ती । तेही वावरती घरांत ।। ५४ ।।
ऐशा विविध तापांचा । त्रास दोघांना व्हायचा ।
धांवा करिती देवाचा । मनोमनी दोघेही ।। ५५ ।।
परी दादांची निग्रही वृत्ती । त्रास अंगावर साहती ।
प्रसंग येतां जीवावरती । संतप्त जाहली जानकी ।। ५६ ।।
महाकालिका संचारली । भुतें सर्व बांधिलीं ।
सीमा त्यांची रोखली । नदीपलिकडे त्वरीत ।। ५७ ।।
सायंकाळी तेव्हापासुनी । घराचे पश्चिम दिशेंकरुनी ।
मागील अंगणं लक्षुनी । जानकी बैसे नित्याची ।। ५८ ।।
करी धरुनियां उदबत्ती । लक्ष मात्र नदीवरती ।
नजर राहे शून्यावरती । ऐसें दिन-मास चालतसे ।। ५९ ।।
मुलांना बसवी झोपाळ्यावरती । सांगे – म्हणावे शुभं करोती ।
स्वत: बसे देवापुढती । पश्चिम दिशेसी लक्षोनियां ।। ६० ।।
ऐशीच एकदा लक्षुनी । उभी असतां ती अंगणीं ।
एक मनुष्य येई सदनीं । म्हणे भविष्य वर्तवितों चांगलें ।। ६१ ।।
मुलीं त्याला घेऊनी येतीं । मागील दारीं आईपुढती ।
म्हणे भविष्य सांगावें निश्चिती । आईचे तू आम्हांला ।। ६२ ।।
ज्योतीषी म्हणे द्यावा कर । आई बोट दाखवूनी समोर ।
म्हणे भविष्य वर्तवावे लौकर । याच व्यक्तीचे तुवां ।। ६३ ।।
तेथें दृश्य होतें दिसत । भूतें असंख्य होती नाचत ।
किंचाळून होती कण्हत । घाम फुटलासे तयाला ।। ६४ ।।
म्हणे आवर आवर माऊली । माझी मती येथे खुंटली ।
ऐसी बोबडी तयाची वळलीं । पळालासे तेथून ।। ६५ ।।
मुली विचारती आईला । कायाले ज्योतिषाला ।
तेव्हां ती सांगे सकलां । इतिहास या भूतांचा ।। ६६ ।।
ही युद्धभूमी होती पूर्वीची । तेथे कत्तल झाली सैन्याची ।
मुक्ति न मिळतां त्यांची । वस्ती येथें राहिली असे ।। ६७ ।।
नित्य सायंकाळचे समयाला । हाक मारिती ती मजला ।
म्हणे मुक्ति द्यावी आम्हांला । शरण आलों तव पायीं ।। ६८ ।।
ऐसे काहीं मास गेले । दिन आषाढाचे आले ।
नभीं मेघ पहा गर्जले । वर्षा झाली चोहीकडे ।। ६९ ।।
वेंगणीया नदी आहे दूर । तिला आला भयंकर पूर ।
पाणी आलें घरा सभोवार । कित्येक दिवस राहिलें ।। ७० ।।
असंख्य सर्प वळवळती । बाहेर पडाया वाटे भीती ।
दरुवाड्यातील स्त्रिया जमती । धांव घेती जानकीकडे ।।७१ ।।
म्हणें काहीं उपाय करावा । पूर आता ओसरावा ।
जानकीचा करितीं धांवा । रक्ष-रक्ष गे म्हणोनी ।। ७२ ।।
करीं तीर्थ देवाचें घेऊनी । म्हणे मजसवें सर्वांनी ।
चलावें या पाण्यांतुनी । सात पाऊले बरोबर ।। ७३ ।।
परि सर्प पाण्यात वळवळती । पाऊल टाकण्या वाटे भीती ।
म्हणोनी जानकी निघे पुढती । तीर्थ पाण्यात ओतुनी ।। ७४ ।।
म्हणे गंगे तूं होई शांत । आतां त्वरित व्हावें गुप्त ।
सर्व भुतें-प्रेतें होती मुक्त । तव कृपाप्रसादानें ।। ७५ ।।
पाणी ओसरलें त्वरीत । सर्व सर्व झाले गुप्त ।
गांव सर्व आश्चर्य करीत । काय झाले म्हणोनियां ।। ७६ ।।
तेव्हां जानकी तयांना सांगत । कीं गंगा आली प्रत्यक्षांत ।
भुतें परिसरांतील उद्धरीत । जे सर्परूपें वावरिती ।। ७७ ।।
आतां तुम्हांस नाही भीती । सुखें करावी येथें वस्ती ।
पावन केली तुमची धरती । स्वयें गंगेनें प्रकटोनी ।। ७८ ।।
लोकमात्र आश्चर्य करिती । कीं भगीरथाची झाली पुनरुक्ती ।
जय जानकी तुझी कीर्ति । आम्ही गाउं जन्मभरी ।। ७९ ।।
कीर्ति हळूहळू पसरतां । स्त्रियां येती दर्शनाकरितां ।
जानकी प्रसाद देई भक्तां । संतोषवितें सर्वांना ।। ८० ।।
कोणीही येतां सुवासिनी । तिची ओटी भरती श्रीफलांनी ।
नारळ लाभे कोनाड्यांतुनी । कळे न कैसा येई तो ।। ८१ ।।
देवा जवळील कोनाड्यांत । वाटे कल्पतरु होता राहत ।
इच्छित वस्तु होती लाभत । जानकी मुखें वदतां ।। ८२ ।।
एकदां दादा होते देवा वंदीत । तेव्हां लक्ष गेले कोनाड्यांत ।
तेथे श्रीफळ दिसतां कृद्ध । जाहले कीं जानकीवरी ।। ८३ ।।
कशास गोळा करून । नारळ ठेवितां आणुन ।
मी देतों तया फेंकून । म्हणुनी उचलीला तो तयांनीं ।। ८४ ।।
उचलोनी ठेवितां बाहेर । अणि परतोनि पाहतां सत्वर ।
दुसरा होता जागेवर । तोही काढला रागानें ।। ८५ ।।
ऐसा ठेवितां ठेवितां काढुन । दुजा उत्पन्न होई तत्क्षण ।
ढीग नाराळांचा पाहून । आश्चर्य करिती थकोनियां ।। ८६ ।।
तेव्हां जानकीस वंदून । म्हणती किती हे असतील जाण ।
म्हणे आम्ही सर्व मिळून । दैवतें जितकीं असूं येथें ।। ८७ ।।
श्रीफळें पाहिलीं मोजुन । तीं हजार जाहली म्हणून ।
साष्टांग करिती नमन । क्षमा करावी म्हणोनियां ।। ८८ ।।
यावरून श्रोतेजन । तुम्हां आले असेल कळून ।
की ‘दरिद्री नारायणी’ म्हणून । दुर्गा आलिसे भूवरि ।। ८९ ।।
दारिद्र्याचें कराया निवारण । दु:खितांचे कष्ट कराया हरण ।
तेही सोसून पहाया जवळून । गरीब कुळी जन्मलीसे ।। ९० ।।
दु:ख तयांचे पुसून । स्वत: दु:खाचे कढ पिऊन । सुखवितसे जनांना ।। ९१ ।।
ती नव्हती सुशिक्षित । परि सर्व भाषा होत्या अवगत ।
ओव्या असती नित्य मुखांत । गीतें वेगवेगळाली गातसे ।। ९२ ।।
वर्णनें असती देवींचीं । त्यांच्या सुंदर भव्यपणाचीं ।
गानमुग्ध निश्चित ऐकणारे । होत असत तेधवा ।। ९३ ।।
झोपाळ्यावर बैसे आपण । हर्षे ओव्या मुखें गाऊन ।
पाहणारा जाई चक्रावून । दृश्य तें पाहतां क्षणैक ।। ९४ ।।
तेथें त्या न दिसे जननी । प्रत्यक्ष पाही ‘दुर्गा भवानी’ ।
नखशिखान्त सुंदरता पाहूनी । थक्क होई मनात ।। ९५ ।।
सुंदर पर्या येती दिसुनी । झोकें घालतीं हातांनी ।
जानकी होई जगज्जननी । दृश्य होई मग अदृश्य ।। ९६ ।।
ज्यांना घडलें ऐसें दर्शन । ते धन्य घेती म्हणवून ।
ते सर्व जाहले पावन । केवळ सान्निध्याने माऊलीच्या ।। ९७ ।।
नवरात्रीचे येतां सुदिन । आणि असतां सुवासिनी पूजन ।
मंजुळ स्वर येती कोठून । संगीताचे ऐकावया ।। ९८ ।।
जवळ जवळ ते जैसे येती । वाटे गरबे कोणी खेळती ।
खोलीतच फेर धरती । इतकें स्पष्ट कळतसे ।। ९९ ।।
जानकी करीतसे खूण । स्वस्थ बसावें म्हणून ।
तुम्ही घ्यावे पाहून । खेळ देवींचा चालला ।। १०० ।।
देवता येऊन खेळती । कुंकवाची पदकमलें उमटती ।
घरी जानकीचीही करिती । मिळून सर्व आरती ।। १०१ ।।
देवींचें संपता पूजन । सुवासिनी करिती वंदन ।
जानकी काढी ओटीतून । प्रसाद कुंकू उधळाया ।। १०२ ।।
खडींसाखर देई काढून । त्यांची इच्छा करितसे पूर्ण ।
शिरीं कृपाकर ठेवून । आशिर्वाद देत असे भक्तांना ।। १०३ ।।
जय जय जानकी जगज्जननी । आशिर्वाद लाभावा म्हणोनी ।
लीन जाहलो तव चरणीं । कृपा असावी भक्तांवरी ।। १०४ ।।
प्रेमस्वरूप तूं प्रत्यक्ष । ध्यानीं न घ्यावा आमचा दोष ।
तुझा घडावा सहवास । सदैव आमुच्या जीवनीं ।। १०५ ।।
जानकी दिसे दरिद्री नारायणी । परि प्रत्यक्षात ती भद्रकारिणी ।
वारंवार करिती विनवणी । नमो दैव्यै…! म्हणोनियां ।। १०६ ।।
देवता येती पृथ्वीवर । जानकीसी वंदाया वारंवार ।
मग मी अल्प मति पामर । काय वर्णन करूं शके ।। १०७ ।।
तरी ऐकावें श्रोतेजन । मनोभावें जावें शरण ।
जानकी कथेचें करितां श्रवण । फलद्रूप होती कामना ।। १०८ ।।
इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम द्वितीयोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।
Leave a Reply