।। श्री ।।
।। अथ चतुर्दशोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।
मागील अध्यायी केलें कथन । त्यावरून आलें कळून । जानकी न गेली आपणांमधून । निर्गुण रूपें वावरतसें ।। १ ।।
आर्त हांक ऐकून । निर्गणानें यावे धावून । सहाय्य करावें प्रकटोन । सुभक्तासी आपुल्या ।। २ ।।
ऐसा जानकीभक्ताचा । लपंडाव चाले प्रेमाचा । परि प्रत्यक्ष दर्शनाचा । लाभ न होई भक्ताला ।। ३ ।।
नाना, दीर कुसुमताईचे । लग्न ठरलें असे त्यांचे । बिलीमोर्यास करावयाचें । निश्चित झालें असे कीं ।। ४ ।।
सर्व मंडळी जमली । लग्नघाई सुरू झाली । एक मणाची बुंदी करावी । ठरलें असें तेधवां ।। ५ ।।
बिलीमोर्यांत होता राहत । तो आचारी केला निश्चित । सर्व वाट होते पाहत । येईल लाडू करावयाला ।। ६ ।।
सकाळी येणारा आचारी । न ये दुपार झाली तरी । बोलवणें पाठविलें घरीं । रात्रीपर्यंत न आला ।। ७ ।।
ऐसें कळलें तपासाअंती । तो बाहेर गेला परप्रांतीं । आतां भरंवसा न देती । मंडळी त्यांचे घरांतील ।। ८ ।।
एकटाच होता बिलीमोर्यांत । म्हणोनि विसंबोनि राहत । कार्य होईल कैसे म्हणत । उदईक आपणाकडे ।। ९ ।।
पीठ तयार केलें भिजवून । म्हणोनि दुसरा पाहतो शोधून । परी कोणी न मिळे म्हणून । काळजीँत पडली मंडळी ।। १० ।।
जरी रात्रींत न आलें घडून । तरी पीठ जाईल आंबून । कैसें रहावें विसंबून । आचार्यावरी कळेना ।। ११ ।।
कसुमताई करिती विचार । कीं आईस सांगावें सत्वर । उभ्या राहती देवासमोर । प्रार्थना करिती मनोमनीं ।। १२ ।।
जयजयाजी माऊली । आमची मती असे खुंटलीं । बुंदी करावया काढीली । परि आचारी कोठे मिळे ना ।। १३ ।।
उदईक असे लग्न दिराचें । त्यांत पक्वान्न आहे लाडूचें । परि आतां काय करावयाचें । तूंच घ्यावे पाहून ।। १४ ।।
सर्व मंगल कार्या करितां । पाठिशी आशीर्वाद असतां । पडू नये कमतरता । कोणत्याही गोष्टीची ।। १५ ।।
जेथें दिसेल न्यून । तें तुम्हीच घ्यावे करवून । उणेपणा न यावा दिसून । सांभाळावें गे माऊली ।। १६ ।।
तिज ऐसी विनंती करून । वाट पाहती बसून । तो रात्रीं आले दोघेजण । झारे घेऊनी खांद्यावरी ।। १७ ।।
म्हणती आम्हां ऐसें कळलें । बुंदीवाचुनि कार्य अडलें । तरी सामान द्यावें सगळे । सत्वर बुंदी देऊ करून ।। १८ ।।
किती करावयाच्या म्हणून । विचारिती दोघेजण । एकमणाच्या असें सांगून । सामान दिलें तयांना ।। १९ ।।
चुला बांधिला दोघांनीं । लाकडें दिलीं पेटवूनी । उघडे पंचा कसुनि । बैसले बुंदी पाडाया ।। २० ।।
पाहतां पाहतां दोन तासांत । बुंदी पाडिल्या ताटांत । लाडू वळूनियां देत । आनंद जाहला सकलांना ।। २१ ।।
हांसत येती समोर । म्हणती आम्ही जातों सत्वर । उद्या येऊनियां लौकर । पैसे घेऊन जाऊं आम्ही ।। २२ ।।
लग्न जाहलें थाटांत । उणीव कसलीही ना भासत । परी आचारी ना येती परत । पैसे घ्याया बुंदीचे ।। २३ ।।
तपास केला नवसारींत । शोध केला बिलीमोर्यांत । आचारीद्वय ना दिसत । नव्हते ओळखीत कोणीही ।। २४ ।।
कुतूहल जागलें मनांत । ऐसे कोण होते अद्भुत । पैसे घेण्या न येत । श्रम केले फुकट कसे ।। २५ ।।
तेव्हां येऊनियां स्वप्नांत । जानकी कुसुमला सांगत । ते आचारी प्रत्यक्षांत । होते बापुजी आणि खंडेराव ।। २६ ।।
तुमची पाहोनियां अडचण । दोघे धांवले आचारी बनून । लाडू दिले असती करून । कुलदेवानें तुमच्याच ।। २७ ।।
स्वप्न सर्वांना सांगितले । तेव्हां आश्चर्य त्यांना वाटलें । सारें आईमुळेंच घडलें । खात्री जाहलीसे सर्वांची ।। २८ ।।
मुंबईचे वैद्य प्रभाकर । सहकुटुंब येती मणीनगरांत । जाणें असे भावनगरास । कामानिमित्त तेथुनी ।। २९ ।।
परि येता मणीनगरांत । जातीय दंगा उद्भवत । आणि तंग वातावरणांत । बाहेर पडूं न शकती ।। ३० ।।
कामानिमित्त निघाले । पुढें जाणें भाग पडलें । परि मध्येच ऐसे अडकले । अचानक या दंगलीनें ।। ३१ ।।
बहुत विचार केला । जाणें असे भावनगरला । परि दंग्याचा जोर वाढला । काय करावें कळेना ।। ३२ ।।
मणीनगरला पत्नीस ठेविती । एकटेच भावनगरला जाती । ऑफीसचें काम उरकती । तांतडीनें शक्य तों ।। ३३ ।।
पोहचतां भावनगरांत । दंगल तेथेंही जाई वाढत । शहर केलें संचारबंदिस्त । काय करावें कळेना ।। ३४ ।।
संपूर्ण गुजरात राज्यांत । संचार बंदी लागू करित । ऐसें तयांना कळलें वृत्त । उपाय खुंटला तयांचा ।। ३५ ।।
मिलिटरी लाविली रस्त्यांत । सर्व व्यवहार झाले थंडावत । कैसें जावें मणीनगरांत । पत्नीस घ्यावया कळेना ।। ३६ ।।
दूर होतें रेल्वे स्टेशन । तेथें न जाऊ शकती म्हणून । टॅक्सी पाहती शोधून । रस्त्यावरी येऊनियां ।। ३७ ।।
बहुत टॅक्सीवाले भेटती । परि स्पष्टपणें नकार देती । संचारबंदीची वाटे भीती । तयार न होती कोणीही ।। ३८ ।।
परि वैद्य तयांना सांगत । अधिक पैसे देण्यासम्मत । मज न्यावें अहमदाबादेंत । टॅक्सीमधून आपल्या ।। ३९ ।।
परि सर्व नकार देती । तेव्हां वैद्य निराश होती । दंग्याची वाटे भीती । एकटेच दूर म्हणोनियां ।। ४० ।।
तेव्हां प्रार्थना करिती मनांत । जयजय बायजी आई म्हणत । येथेंच अडकलों दंग्यात । मार्ग सांपडेना निघण्याचा ।। ४१ ।।
मार्ग न राहे सुरक्षित । आगी लाविती गांवांत । खून होती की रस्त्यांत । कैसें परतावें कळेना ।। ४२ ।।
ऐसा ते करितां विचार । तों एक टॅक्सी आली समोर । यावयाचें का सत्वर । अहमदाबादेस चाललों ।। ४३ ।।
वैद्य गेले धांवून । म्हणे मणीनगर द्यावे पोहचवून । मागशील तेवढे देईन । पैसे मी तुजला रे ।। ४४ ।।
टॅक्सीत बैसले तत्क्षण । एकट्यास चालली घेऊन । टॅक्सी निघाली तेथून । भरधांव चालली मार्गानें ।। ४५ ।।
संपूर्ण संचार बंदीत । शुकशुकाट पाहिला वाटेंत । पोलीसही घालतां गस्त । ठिकठिकाणी दिसले ।। ४६ ।।
एकटीच गाडी रस्त्यामधून । चालतांना आली दिसून । परी कोणी न आडवी म्हणून । आश्चर्त वाटलें वैद्यांना ।। ४७ ।।
गाडी सरळ आली मणीनगरी । वैद्य उतरले घरासमोरी । पैसे किती म्हणून विचारी । द्यावयाचे रे तुजला ।। ४८ ।।
द्यावे दहा रुपये त्वरित । पुढें जाणें असे घाईत । पैसे घेऊनियां हातांत । गाडी घेऊन निघून गेला ।। ४९ ।।
वैस्य घरामध्यें शिरती । तों सर्व आश्चर्ये पाहती । म्हणे कैसे आलांत एकांतीं । कडक संचार बंदीत ।। ५० ।।
तेव्हां ते सर्वांना सांगत । कीं टॅक्सी केली भावनगरांत । ती सरळ आली घरापर्यंत । दहा रुपयांत केवळ ।। ५१ ।।
सर्व जाहले आश्वर्यचकीत । रेल्वे भाडे असतां बहुत । तुम्हां कैसे आणिलें दहा रुपयांत । टॅक्सीवाल्यानें कळेना ।। ५२ ।।
अरे ! भावनगर ते मणीनगर । टॅक्सीचे पैसे दोनशेंचे वर । ऐसा कोण हा करुणाकर । दहा रुपयांत आणी तुम्हांला ।। ५३ ।।
बहुत जणांना विचारलें । परी सर्वांनीच येणें नाकरिलें । अखेर आईस मनीं प्रार्थिलें । सोय करावी म्हणोनियां ।। ५४ ।।
तोंचि टॅक्सी आली समोर । जिनें आणिलें येथवर । आईचे थोर उपकार । सुरक्षित आलों येथें हे ।। ५५ ।।
आईची असतां जया छाया । तो मुक्त भयापासोनियां । तिची लाभेल प्रेममाया । भक्तासी आपुल्या ।। ५६ ।।
ऐसी तिची कृपा पाहून । पती पत्नी घालती लोटांगण । सानंदें निघती तेथुन । मुंबईस जाती स्वगृहासी ।। ५७ ।।
जैसे साईबाबांचे चरित्रांत । ते घोडा गाडी घेऊनियां जात । इच्छित स्थळीं पोहोंचवित । भक्तासी आपुल्या ।। ५८ ।।
तैसेंच येथे आले घडून । जानकी आली टॅक्सी घेऊन । भक्तास दिलें संरक्षण । घरी त्याला पोहोंचवूनी ।। ५९ ।।
कथेची जाहली पुनरावृत्ती । आनंद जाहलासे चित्तीं । संत वचनास जागती । अगम्य लीला दाखविती ।। ६० ।।
फर्टिलायझरचे भोजनालयांत । मॅनेजर म्हणुनी कार्य करित । वसंत धुमाळ होते पहात । कारभार हा सर्वस्वीं ।। ६१ ।।
जें लागेल भोजनालयांत । ते माल घेती तो विकत । भाजीपाला कडधान्यासहीत । माल भरती स्वहस्ते ।। ६२ ।।
रोज किती मंडळी येतीं । स्वयंपाकाचा अंदाज देतीं । पदार्थ करावया सुचविती । आचारी कामकर्यांना ।। ६३ ।।
एकदां ठेविली मेजवानी । कार्यकारी मंडळी येणार म्हणूनी । बडे पाहुणे ही येती त्या दिनीं । त्याच भोजन समारंभास ।। ६४ ।।
गव्हाचें पीठ आणिलें दळून । चार पांच मणांचें म्हणून । अर्धा अर्धा मण । पुर्या चपात्या करावया ।। ६५ ।।
पदार्थ केले बहुत । वेळ जेवणाची आली होत । पीठ भिजवावया सांगत । गरम पर्या करावया ।। ६६ ।।
जैसें भिजविलें पीठ । तों उणीव कांही दिसली त्यांत । म्हणोनि धुमाळांना सांगत । पीठ तपासूनी पहावया ।। ६७ ।।
ते पुरी खाऊनी बघत । तों कचकच लागली मुखांत । थूऽथूऽ करूनि टाकित । मनांत भीति उपजली ।। ६८ ।।
वायां गेलें सरर्व पीठ । आतां पुरी चपाती कैसी होत । जेवणाची वेळ आली होत । काय करावे कळेचि ना ।। ६९ ।।
दुसर्या पिठाची करावी तयारी । तों ते शक्य नव्हतें आता तरी । अल्प वेळांत तयारी । कैसी करावी कळेना ।। ७० ।।
जरी भोजनांत ऐसें खाती । सर्व थुंकोनियां टाकिती । दूषण वसंतास देती । काय पाहिलेस म्हणोनिया ।। ७१ ।।
नोकरी होती नवीन । जरी ऐसें येतें घडून । तरी वाया जाईल अन्न । आणि रोष होईल वरिष्ठांचा ।। ७२ ।।
जरी न वाढावी चपाती-पुरी । तरी न्यूनत्व दिसेल भोजनांतरी । फोटो ठेवूनि समोरीं । जानकी आईस प्रार्थितीं ।। ७३ ।।
जयजय जानकी माऊली । कृपेनें तव नोकरी मिळाली । आतां फजितीची वेळ आली । रक्षावें गे बाळकासी ।। ७४ ।।
सर्व पिठांत कचकच मिसळली । पुरी चपाती वायां गेली । मेजवानीची मजा गेली । ऐन वेळेला ही ऐसी ।। ७५ ।।
तुवां घ्यावें सांभाळून । मी ऐसेंच वाढीतों जेवण । नांव तुझे नेईल तारून । संकटसमयीं या मजला ।। ७६ ।।
ऐसी करूनिया विनंती । धुमाळ स्पष्टपणें सांगती । न करावी चिंता चित्तीं । वाढा ऐसेंच सर्वांना ।। ७७ ।।
मी सर्व घेईन पाहून । तुम्ही न जावें घाबरून । सर्व पाहतीं पुढें राहून । आदरातिथ्य करितीही ।। ७८ ।।
मजेंत चाललें भोजन । पुर्या-चपात्या घेती मागून । कोणाही न आलें कळून । पीठांतील त्या कचकच ।। ७९ ।।
जैसे सर्व जाती उठून । फोटोस घातलें लोटांगण । मज घेतलेस सांभाळून । धन्य धन्य माऊली ।। ८० ।।
उरलेल्या पाहती चाखून । तो तैसेची आली कच दिसून । त्या सर्व देती फेकून । संतुष्ट होऊनी मनांत ।। ८१ ।।
तो शरण गेला माऊलीला । म्हणोनि प्रसंगातून सावरला । ऐशा तिच्या अद्भुत लीला । भक्त जन अनुभविती ।। ८२ ।।
दुसरी ऐसीच कथा घडली । सत्यनारायणाची पूजा ठेविली । तैं आप्त मंडळी जमली । विलेपार्ल्यांत एकदां ।। ८३ ।।
भक्त होता शौकीन । कार्यक्रम ठेविला म्हणून । कोण्या एकाचें सुश्राव्य गायन । तान्निमित्त स्वगृहीं ।। ८४ ।।
रंग भरला गायनांत । मंडळी जमली बहुत । कॉफी करिती मध्यंतरांत । रात्रीचे समयीं म्हणोनियां ।। ८५ ।।
कॉफी करावया चांगली । जायफळ नी वेलची घातली । भरपूर दुधाची केली । चव स्वादिष्ट यावया ।। ८६ ।।
घमघमाट सुटला चांगला । तैं थोडी देती चाखावयाला । तोंच चाखणारा वदला । दूध नासलें कॉफीतलें ।। ८७ ।।
नासक्या दुधाची म्हणून । चव आलीसे कळून । आतां कैसी द्यावी नेऊन । चिंता उत्पन्न जाहली ।। ८८ ।।
रात्र झालीसे म्हणून । दूध न मिळे बाहेरून । मुंबईत ऐसी अडचण । भासतसे सर्वांना ।। ८९ ।।
तोंच मधली झाली विश्रांती । यावें घेऊनी कॉफी म्हणती । तो यजमान घावरून जाती । काय करावें कळे ना ।। ९० ।।
तेव्हां यजमानीण बाई सांगती । कालेस बोलावून घेती । म्हणे प्रसंग करील फजिती । आज आमची निश्चित ।। ९१ ।।
तुवां प्रार्थावें आईस । सांभाळून घ्यावें आम्हांस । ती धांवेल तुझ्या हांकेस । प्रसंग घ्यावा सावरून ।। ९२ ।।
लोकां लोकांस पावते । आमच्यात न्यून काय बघते । तुवां प्रार्थावें आमच्यावरचें । विनंती करितें मी तुजला ।। ९३ ।।
दुसरा एकच कप द्यावा करून । कालेनें सांगितलें म्हणुन । त्वरीत बनवी यजमानीण । कालेंकरीं तो कप देई ।। ९४ ।।
मनोमनीं आईस विनवून । नैवेद्य कॉफीचा दाखवून । म्हणे घ्यावें आम्हां सांभाळून । प्रसाद म्हणूनी प्राशी तो ।। ९५ ।।
तो प्रसाद कप दिला ओतून । कॉफीच्या त्या भांड्यांतून । म्हणे निश्विंत प्या हो सर्वजण । वास गेलासे उडून ।। ९६ ।।
कप विश्वासानें भरती । कॉफी भरभरूनी धाडती । कौतुके सर्व कॉफी पिती । उत्कृष्ट झाली म्हणोनियां ।। ९७ ।।
कोणा न आलें कळून । कीं दूध नासलें म्हणून । प्रसंग घेतला सावरून । जानकीनें भक्ताचा ।। ९८ ।।
यजमानीण गेली आनंदून । कालेस बोले मिठी मारून । तुम्हीं केवळ भक्त म्हणून । सावरिलेंसे आम्हांला ।। ९९ ।।
आमुच्या करितां खास । तुवां कष्ट दिले आईस । कैसे फेडूं उपकारांस । मला कांहींच कळेना ।। १०० ।।
आनंदाश्रूंनीं डोळे भरती । जयजय जानकी म्हणती । साष्टांग नमन करिती । मनोमनीं तियेला ।। १०१ ।।
ऐशा जानकीच्या कथा । तुम्हांस मी सांगत असतां । मनांत दाटे प्रसन्नता । गहिंवर येती प्रेमानें ।। १०२ ।।
संत असती प्रेमळ । साहूं न शकती तळमळ । आर्तता पाहती केवळ । भक्तांची ते आपुल्या ।। १०३ ।।
जो नि:स्वार्थी करील प्रेम । तोचि जानकीचें धाम । साह्यार्थ धावणें नेम । सदैव राही तियेचा ।। १०४ ।।
जरी प्रत्यक्ष न घडे दर्शन । अदृश्य रूपें वावरून । सावली परी राहून । पदराखाली घेतसे ।। १०५ ।।
तिच्या नांवाचा आधार । भक्त घेती वारंवार । कराया भवसागर पार । तरून गेले कित्येक ।। १०६ ।।
तुम्हीं मागें राहिलां म्हणून । नका खंत करूं मनांतून । गुणगायन करावें रंगून । भक्तिभावें-प्रेमानें ।। १०७ ।।
ऐसें करितां भक्तजन । तिचें प्रेम होईल संपादन । तुम्हांस ती होईल प्रसन्न । संतोषुनी तारील ।। १०८ ।।
इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम चतुर्दशोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।
Leave a Reply