सावली अध्याय ३ रा

।। श्री ।।
।। अथ तृतीयोऽध्याय: ।।

श्रीगणेशाय नम: ।
श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: ।
श्रीगुरुभ्यो नम: ।।

श्रोते मज सांगती । कीं आम्हीं प्रसन्न होतो चित्तीं ।
तू सांगतोस जो कीर्ति । महिमा आम्हांस जानकीचा ।। १ ।।

भक्तीनें येते उचंबळून । हृदय जातें हेलावून ।
भरून येती लोचन । भावभक्तीनें आमचे ।। २ ।।

विसरोनीयां तहान-भूक । श्रवणाचें लाभावें सुख ।
तरी होऊनियां भिक्षुक । तुजपुढें बैसलों कीं ।। ३ ।।

हृदयांच्या या झोळींत । दान द्यावें चरितांमृत ।
प्रेमानंदाने ओतप्रोत । हृदय जावें भरून ।। ४ ।।

तुम्हीं न व्हावें निराश । तुम्हां कथितो मी सावकाश ।
जानकीचा जीवनप्रवास । प्रसन्नचित्तें परिसावा ।। ५ ।।

तिचा कंटकमय होता मार्ग । कल्पनेंतही नव्हता स्वर्ग ।
ती सदैव राहे गर्क । कर्ममार्गांत आपुल्या ।। ६ ।।

स्वत:चा करूनी संसार । दुसर्‍यांनाही देई कराधार ।
सदैव करितसे परोपकार । परपीडा हरोनियां ।। ७ ।।

नांदत्या गोकुळांत । गायी-म्हशी येती गोठ्यांत ।
दूध-तूपही घरांत । होत असे चांगले ।। ८ ।।

उत्तम होतें गोधन । तेंचि वाटे परमार्थसाधन ।
जानकी करीतसे तत्पूजन । नित्य सेवा करोनियां ।। ९ ।।

मायेचा फिरवी हात । गाई वासराशीं बोलत ।
दुग्धधना सिद्ध होत । तेव्हां कोठे गाई या ।। १० ।।

सायंकाळी येती चरून । आणि घडतां जानकीचे दर्शन ।
स्वागत करिती हंबरून । मुकी माया गुरांची ।। ११ ।।

जरी न घडे दर्शन । तरी पान्हा घेती आवरून । ऐसे प्रेमाचें होतें बंधन । गाई-वासरावरीं तियेचें ।। १२ ।।

दादा उठूनिया प्रभातीं । गाई-वासरांची निगा राखिती । परी कधीं कधीं मारिती । पाठीवरती रागानें ।। १३ ।।

जानकी सांगतसे विनवून । की राग न धरावा आपण । परि क्रोधातें नावरून । गुरांना मारिती ते ।। १४ ।।

गुरें मात्र शांत राहती । मार न बसे पाठीवरती । झेलून घेई पाठीवरती । जानकी तो च आपुल्या ।। १५ ।।

काठीचे वळ उमटती । जानकीच्या या पाठीवरती । तेव्हां दादा शांत होती । अपराध केला म्हणूनियां ।। १६ ।।

गुरांना येई कळून । जानकींचें हें मोठेपण । कृतज्ञतेनें भरून । लोचन येती तयांचे ।। १७ ।।

गोर-गरिबांना देई । दूध-तूपाची चरई । बाळ-बाळंतिणीला होई । आधार या माऊलीचा ।। १८ ।।

कोणी अडला नडला । गणदेवी गांवांत आला । त्याला जानकीचा लाभला । वरदहस्तही कृपेचा ।। १९ ।।

एकदा गणदेवी गांवांत । प्लेगची आली साथ । लागण झाली लोकांत । मृत्युसंख्या वाढतसे ।। २० ।।

गांव करावें खालीं । म्हणोनी दवंडी पिटविली । दूर जंगलांत पळाली । वस्ती सर्व जनतेची ।। २१।।

परी जानकी सांगे भक्तांलागुनी । भयभीत न व्हावें मनीं । मी बांधीन हो सांथीनाही । सीमेवरती रोखीन ।। २२ ।।

पीठ घेऊनियां करांत । सीमेवरी होती टाकीत । म्हणे साथ न येई गावांत । बांधिली असे तियेला ।। २३ ।।

स्वत: फिरे गांवांत । मृत उंदिरांतें शोधित । गोळा करून टाकित । स्वहस्ते ती माऊली ।। २४ ।।

जरी कोणा झाली लागण । कबुतराची विष्टा आणून । स्वहस्ते त्या लावून । सेवा करितसे रोग्याची ।। २५ ।।

ऐसें वाचिलें होतें कथेत । श्रीसाईबाबांच्या पोथींत । तेही रोगांना रोखीत । सीमेवरती पिठानें ।। २६ ।।

कथेची घडली पुनरावृत्ती । परि जानकीची वाढली महती । लोक जयजयकार करिती । जय जानकी म्हणोनियां ।। २७ ।।

कधीं येतां ती खुशींत । मुखीं ओव्या असे गात । आणि मुलांनाही सांगत । गोष्टी वेगवेगळ्या संतांच्या ।। २८ ।।

करीं उदबत्ती धरून । सांगे धुरांत पहावें रोखून । दृश्य येई दिसून । साईबाबांच्या शिरडीचें ।। २९ ।।

द्वारकामाईचें दिसे मंदिर । वरी बाबा दिसती समोर । धुनीही दिसते सुंदर । घडे दर्शन शिरडींचें ।। ३०।।

कधीं दाखवी आरशांत । कृष्णलीलेची गंमत । रासक्रीडाही खेळत । श्रीहरी गोपीसवें ।। ३१ ।।

नित्य ओवी बोलत । गोष्टी मुलांना सांगत । चित्र प्रत्यक्ष दाखवीत । सिनेमा जैसा मुलांना ।। ३२ ।।

ऐसी तिची ऐकुनी लीला । लोक येती दर्शनाला । परी दादांचा क्रोध वाढला । जाऊं न देती कोठेंही ।। ३३ ।।

म्हणे जन आज वंदिती । उद्यां तेचि निंदा करिती । तुझी न व्हावी अपकीर्ति । हेचि इच्छा अंतरीं ।। ३४ ।।

परी मानापमान कीर्ति । याची संतांना नसे क्षिती । आस सत्कर्माची धरिती । केवळ नि:स्वार्थ बुद्धिनें ।। ३५ ।।

उमललेल्या फुलांचा सुगंध । आसमंतात जैसा पसरीत । भ्रमर येती शोधित । कोण तया रोखूं शके ? ।। ३६ ।।

तैसे असती हे संत । भवभयभ्रमर शोधीत । उपकारांपुरते जगत । हरि इच्छा म्हणौनियां ।। ३७ ।।

आहे गणदेवी गांवांत । भव्य ऐशा पटांगणांत । एक शिवमंदिर शोभत । वेंगणीया नदीस लागून ।। ३८ ।।

येतां नवरात्रीचे सुदिन । गांवकरीं येती मिळून । गरबे करिती आनंदून । उत्सव करिती प्रांगणी ।। ३९ ।।

रास गरबे खेळती । जोगवा गीतें गाती । फेर असंख्य धरिती । रात्र रात्र जागोनियां ।। ४० ।।

गांव लोटे बघावया । स्त्रियाही जाती खेळावया । जानकीची मात्र दया । येत असे कीं सर्वांना ।। ४१ ।।

दादांनी घातलें बंधन । गावांत न जावें म्हणून । तिज खोलींत कोंडून । कुलुप लावती स्वत: ते ।। ४२ ।।

घरीं झोंपती ओट्यावर । जानकीवरी ठेविली नजर । पहारा करिती रात्रभर । स्वत: ऐसे जागोनी ।। ४३ ।।

परी कोणीं येईं गांवातुनी । म्हणे काय येथें करता जागोनी । जानकी गात असे गरब्यांतुनी । फेर सुंदर चालला ।। ४४ ।।

वेगवेगळें गाते गीत । आज सुंदर आली रंगात । सारा गांव असे लोटत । काय बैसला तुम्ही अभागी ।। ४५ ।।

दादा संतापुनी बोलत । कीं जानकी असे खोलींत । कैसी जाईल मंदिरांत । खेळावया गरबे ती ।। ४६ ।।

परी मित्र सांगे विनवून । कीं स्वत: पहावें आपण । कीं माझे हें संभाषण । योग्य वा अयोग्य तें ।। ४७ ।।

दादा डोकावती खोलीत । तो जानकी होती निद्रिस्त । होऊनी संशयरहित । उत्सवस्थळी जाती ते ।। ४८ ।।

गरबे येती रंगांत । रात्रींच्या उत्तरप्रहारांत । आबालवृद्ध होते खेळत । मध्ये बैसली जानकी ।। ४९।।

खड्या सुरांत होती गात । लयतालाचें होतें संगीत । दादा डोळे चोळुनी पहात । विश्वास बैसला तयांचा ।। ५० ।।

म्हणती कैसें हें अघटित । घरांत नी गरब्यांत दिसत । जानकीची ही अद्भुत । शक्ति न कळे मज आज ।। ५१ ।।

गांवकर्यांचे प्रेम जाणून । देवी स्वत: अवतरून । खेळतसे गरब्यांतून । जानकीच्या रूपानें ।। ५२ ।।

ऐसे हे तिचें थोरपण । मी वर्णू कसा मतिहीन ?। केवळ भक्तिभावाने जाणून । घ्यावे सुभक्त तुम्ही हो ।। ५३ ।।

जेथें निस्वार्थी असते भक्ति । तेथें देवीची नित्य वसती । सहायार्थ धांव घेती । भक्तालागीं त्वरीत ।। ५४ ।।

सुभक्त ताम्हणे दंपती । नवसारीमध्यें राहती । त्यांच्या मुलास येती । देवी एकदां अचानक ।। ५५ ।।

मोठी उगवण झाली । सर्वांगाची लाही झालीं । तळमळ होऊं लागली । मुलाची ती बघवेना ।। ५६ ।।

फोड सर्वांगी टरटरती । माऊलीच्या मनात उपजे भिती । म्हणोनी डॉक्टर बोलावती । सायंकाळचे समयाला ।। ५७ ।।

नखशिखांत फोडानें भरला । तैसा डॉक्टरही घाबरला । म्हणे उद्यां येई बघायला । आज कांही न करू शके ।। ५८ ।।

डॉक्टर गेल्यावरती । मुलाची होय गंभीर स्थिती । आणि केळीचे पानावरती । काढून ठेवती मुलाला ।। ५९ ।।

रात्र झाली भयंकर । कोणाचा नव्हता आधार । जानकीचा करि तो वारंवार । धांवा मात्र माऊली ।। ६० ।।

जयजय जानकी जननी । माझी करूणा ऐकूनी । माझ्या पुत्रास जीवनीं । रक्षावें गे तुवां ।। ६१ ।।

मी न तुला विसरेन । कुलदीप न जावा विझोन । ओटीत द्यावें दान । मागणें हेंची पायाशीं ।। ६२ ।।

ताम्हण्यांची ऐकतां हांक । दारावर पडली थाप । आश्चर्ये उघडोनी पाहत । जानकी उभी सामोरी ।। ६३ ।।

म्हणे सहज आलें नवसारींत । तुलाही भेटावें वाटत । म्हणोनी रात्रीच शोधत । घरीं आले तुझ्या मी ।। ६४ ।।

पाहतां बालकाची स्थिती । आतां निश्चितच नाहीं भिती । अंगावरोनी हात फिरवती । प्रसाद देती स्वकरें।। ६५ ।।

रात्रभर गाती आरती । करिती देव-देवांच्या स्तुती । बाळास मिळे विश्रांती । पहांट झाली हें कळेना ।। ६६।।

म्हणे सहा ची आहे बस । मी जातें गणदेवीस । आराम पडला बालकास । चिंता न करावी म्हणोनियां ।। ६७ ।।

ऐसी जातां घरांतून । डॉक्टर येती मागाहून । कारण रात्रीचे लक्षणावरून । ग्रासला मनीं चिंतेनें ।। ६८ ।।

बाळास पाहती तपासून । तों फोड गेले होते सुकून । विश्रांती मिळाली म्हणून । टवटवीत दिसले मुख ।। ६९ ।।

म्हणे आतां न या भिती । बाळ आलें तुमचे हातीं । तेव्हां ताम्हणे बाई सांगती । बायजी येऊन गेल्या कीं ।। ७० ।।

रात्रीचे समयीं आल्या । पहाटे पर्यंत राहिल्या । आतां सकाळीच परतल्या । गणदेवीस बसनें ।। ७१ ।।

डॉक्टर जाणून होती किर्ती । परी मनांत आश्चर्य करिती । ही अशिक्षित स्त्री मूर्ती । रात्री कैसी आलीसे ।। ७२ ।।

गणदेवीहून नवसारींत । नव्हती बसची वाहतुक । आणि घराचाही असतां धांक । येऊनी ही गेली कैसी ।। ७३ ।।

परी ताम्हणेबाई सांगती । त्यावरी विश्वास ठेवती । आणि गणदेवीस जाती । आपुल्याच वाहनानें ।। ७४ ।।

तेथें जाऊन पाहत । तों जानकी होती तळमळत । वायगोळ्यानें दुखत । पोटांत तियेच्या ।। ७५ ।।

ती न गेली घरांतून । मग कोण गेले धावून । भक्ताची हांक ऐकून । देवीस्वरूप गेलें कीं ।। ७६ ।।

श्रीगुरुचरित्रात आहे महती । की गाणगापुरी दत्तात्रेय बसती अष्टरूप आपण होती । भक्ताघरीं जाती रहावया ।। ७७ ।।

मठांतही राहती आपण । आणि सर्वांच्या घरीं जाऊन । पूजा घेती स्वीकारून । आनंदानें एकाच वेळी ।। ७८ ।।

ऐसे हें जानकीचें थोरपण । नानारूप घेतें आपण । भक्तांना देतें अभयदान । केवळ भक्ति प्रेमानें ।। ७९ ।।

सप्तशतींत आहे वर्णन । कीं नऊरूप झाली आपण । सहाय्यार्थ जाती धावून । मातृदेवता सर्वही ।। ८० ।।

गौरी-लक्ष्मी-सरस्वती । जानकीरूपें वावरती । इच्छेचीं करिती पूर्ती । शुद्ध भाव पाहून ।। ८१ ।।

जानकीसी कराया वंदन । पाहुणे येती लांबून । बिलीमोरा-नवसारीहून । नित्य येती कोणी कोणी ।। ८२ ।।

एकदा त्रिंबक राजे येती । कांही दिवस राहती । आंघोळीला म्हणून जाती । चंद्रकांतासवे नदीवर ।। ८३ ।।

कोणास नव्हती माहिती । कीं दोघे कोठें जाती । वाटे गणदेवीस फिरती । सहज ऐसे कोठें तरी ।। ८४ ।।

जानकी होती देवखोलींत । मुलींसंगे बोलत गप्पा येती रंगांत । तोंच थांबली क्षणैक ।। ८५ ।।

देवा पुढें ध्यानस्थ बैसली । आणि पाहतां पाहतां झाली । ओलीचिंब भिजलेली । आश्चर्य करिती सर्व ।। ८६ ।।

मुली विचारती आईला । इतका घाम कैसा आला । आणि पुसोनियां तिजला । सेवा करिती आईची ।। ८७ ।।

तेव्हां ती होती सांगत । की त्रिंबक होता बुडत । त्याला पाण्यातून काढत । असतां मी ओली झालें ।। ८८।।

इकडे राजे असतां बुडत । धांवा जानकीचा करीत । वाटे कुणी दिधला हात । कांठावरती ढकलीले ।। ८९ ।।

त्यांना पाहिलें लोकांनी । काढोनी पोटांतील पाणी । घरी दिलें पोहोंचवुनी । तेव्हां कळली सारी हकीकत ।। ९० ।।

द्वितीय दिनीं त्यांची पत्नी । पूजासाहित्यआली घेऊनी । जानकीचे लागली चरणीं । सौभाग्य दिलें म्हणोनियां ।। ९१ ।।

जय जय जानकी जननी । भक्त सौभाग्य-वरदायिनी । हे भवभयहरणी । कृपा असूं दे आम्हावरी ।। ९२ ।।

केवळ तुझ्या कृपेवांचून । आमुचे न चाले जीवन । तुझेवरी अवलंबून । प्रत्येक क्षणी राहतो की ।। ९३ ।।

तुझे नित्य घडावे स्मरण । गुणगानीं रमावे मन । प्रेमभक्तीने अंत:करण । भरून यावे आमुचें ।। ९४ ।।

ऐसी करूनियां स्तुती । जानकीचे पायां वंदिती । आशिर्वाद तिचा घेती । पतिपत्नी राजेकाका ।। ९५ ।।

एकदां श्रावणधारा वर्षती । मेघ कडाडोनी गर्जती । जानकी उभी ओट्यावरती । मुलासंगें सहज ।। ९६ ।।

पावसाची पाहती गंमत । वरी वीजाही होत्या चमकत । मुलें भिजोनियां सांगत । मौज वाटे किती तरी ।। ९७ ।।

तोंच वीज गेली कडाडून । मुलें सर्व गेली घाबरून । आईस राहती बिलगून । नकळत सर्वही ती ।। ९८ ।।

तोंच मालू सांगे आजीला । वीजेचा कैसा झोत गेला । क्षणार्धांत कीं तो संपला । पाहूं न शके कोणीही ।। ९९ ।।

तोंच आजी बोले हांसून । तुज दाखवितें म्हणून । तैं वीज जातां कडाडून । हात केला थांबावया ।। १०० ।।

नागमोडी होती दिसत । क्षणैक असे तिला रोखीत । स्तब्ध ऐशी आकाशांत । इशार्यानेंच केवळ ।। १०१ ।।

मुलें पाहत होती ती गंमत । वीज आकाशांत शांत । आणि खाली करतां हात । अदृश्य झाली निमिषांत ।। १०२।।

कांही जनही होते पाहत । त्यांचा ‘आ’ राहिला तोंडात । प्रचंड शक्तिची द्योतक । जानकी वाटे तयांवर ।। १०३ ।।

कंसानें सुकन्या मारिली । ती वीज होउन क़डाडली । वाटे वीज असे जन्मली । वीज पोटी अंकुरली । यशोदेच्या पोटी ।। १०४ ।।

जानकी तैसीच जन्मली । वीज पोटी अंकुरली । गणदेवीस या राहिली । तुम्हां आम्हां उद्धराया ।। १०५ ।।

वीज म्हणे ज्ञानप्रकाश । अज्ञानतिमीराचा करी नाश । मायेचा तोडूनियां पाश । आत्मस्वरूपीं नेतसे ।। १०६ ।।

आत्मज्ञानाची कराया प्राप्ती । ज्ञानैकनिष्ठ पाहिजे भक्ती । केवळ अनन्य शरणागती । साधतां लाभेल ती ।। १०७ ।।

म्हणोनियां श्रोतेजन । जानकीचे धरावे चरण । पदीं घालावें लोटांगण । जीवन सफल करावया ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम तृतीयोऽध्याय: । श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*