श्री जानकी आईचे जीवनसार “सावली” या पोथीत पद्यरुपाने आपण नेहमीच वाचतो. “सावली” या पोथीच्या आतापर्यंत ७ आवृत्ती निघाल्या. “सावली”चे इंग्रजी भाषांतरही आता उपलब्ध आहे. मधुकरकाका सुळे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या “सावली”ने भक्तांना सदैव जानकी आईची माया दिली.
मात्र श्री जानकी आईचे जीवनचरित्र गद्यरुपात अजूनपर्यंत आपल्यासमोर आले नव्हते. तेच आता “जानकी जीवनसार” या स्वरुपात येत आहे, रामनवमीच्या शुभदिनी.
=======================================
जिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती आपली श्री जानकी आई अर्थात बायजी.
महाराष्ट्रातील महाडजवळच्या पोलादपूर गावात बायजींचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव दुर्गा. बालपणीच मातेचे छत्र हरपले आणि गावात सांभाळ करणारे कोणीच नसल्याने दुर्गेसहित दुर्गेची सर्व भावंडेही इतस्तत: पांगली. दुर्गेला पोलादपूरजवळच्याच मालुस्ते गावात आजोबा-आजींकडे आणले गेले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत, दरिद्री अवस्थेत दुर्गेला आपले बालपण काढावे लागले.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे दुर्गेच्या ठिकाणी बालपणीच भक्तीचे लक्षण दिसू लागले. ग्रामदेवता श्री मालजाईची पूजा करण्यात दुर्गा रंगून जात असे. पाच वर्षाची असतानाही भजन, पूजनात दंग असणारी दुर्गा आजूबाजूच्या परिसरात शूरवीर, धीट मुलगी म्हणून प्रसिद्ध होती. तिला कशाचीही भीती वाटत नसे.
एकदा मालजाईची पूजा आटोपून बाहेरील पारावर शिवपिंडीची पूजा करुन, फुले वाहून पिंडीपुढे दुधाचा नैवेद्य तिने ठेवला आणि नमस्कार केला. एवढ्यात समोरुन एक भुजंग आला आणि दुध पिऊन चटकन निघून गेला. आजोबांनी ही गोष्ट स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा हे रोजचेच आहे असे सांगून दुर्गा तिथून निघाली. अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी घडत होत्या.
अशीच एकदा नवरात्रात मालुस्त्याच्या सीमेवर दिवसभर खेळत असलेली दुर्गा अचानक बेपत्ता झाली. त्याठिकाणी सर्पांची वस्ती होती. आजी-आजोबांच्या तोंडचे पाणी पळाले. दसर्याच्या दिवशी एका गावकर्याला ती कडाप्याच्या देवळात देवी-कालिकेच्या सान्निध्यात निद्रिस्त असलेली सापडली. तिला तु कोठे होतीस असे विचारताच तिने सांगितले की “मी देवीबरोबर खेळायला गेले होते. मला तिथे खूप देवता भेटल्या. त्यांनी मला उचलून नेले. मी रास गरबा खेळले, मिष्टान्न जेवले. मला तिथून परत यावेसे वाटत नव्हते. त्यावेळी देवींनी मला सांगितले की – आम्ही सदैव तुझ्याजवळच राहू आणि तुझी सगळी सुखदु:खे आम्हीही सहन करु.” तेव्हापासूनच सर्वसामान्य वाटणार्या दुर्गेचे असामान्यत्त्व सिद्ध होऊ लागले.
लग्नानंतर दुर्गेची जानकी झाली. लग्नानंतरही दारिद्र्याने पाठ सोडली नाही. उभय पतिपत्नी महाराष्ट्र सोडून गुजरातमधील गणदेवी या गावात आले. पती शांताराम म्हणजेच ति. दादा हे अत्यंत कोपिष्ट स्वभावाचे होते. मात्र जानकी आईच्या शांत स्वभावापुढे त्यांचे काहीच चालत नसे. याच गणदेवी गावात दादांनी मामलेदाराच्या कचेरीत नोकरी पत्करली.
जानकीआईने याच गणदेवी गावाला पवित्र केले. अशक्य, असामान्य, अतर्क्य लीला करुन आपल्या भक्तांचे तिने रक्षण केले. एकच लुगडे आणि चिंध्यांची चोळी अशा परिस्थितीतही तिने सुखाचा संसार केला आणि तोही विश्वाचा! थोर पतिव्रता जानकी आईने अत्यंत जागृत गृहिणी, वात्सल्यरुपी माऊली आणि श्रेष्ठ संत अशा भूमिका समर्थपणे वठवल्या.
जानकी आई रहात असलेल्या घराच्या आसपास पूर्वी राजपूतांची वस्ती होती. युद्धात लुटलेली संपत्ती घरात पुरुन ठेवलेली होती. त्यावर रात्रंदिवस भुजंग वावरत असत. एकदा पावसाळ्यात जवळच्या वेंगणिया नदीला पूर आला. गाव पुराने ग्रस्त झाले, घरेदारे जलमय झाली. पाण्यात असंख्य सर्प वळवळू लागले. स्त्रियांनी जानकीचा धावा केला. देवाचे तिर्थ हातात घेऊन सर्व स्त्रियांसह जानकी त्या पाण्यातून निघाली. तिर्थ पाण्यात ओतून तिने गंगामातेची प्रार्थना केली. हळूहळू पाणी ओसरु लागले. साप-भुजंग गुप्त झाले आणि भूताप्रेतांना मुक्ती मिळाली. सार्या गावाला आनंद झाला. जानकीची किर्ती सर्वत्र पसरली.
जानकीच्या घरच्या कोनाड्यात साक्षात कल्पतरु नांदू लागला. हवी असलेली वस्तू त्या कोनाड्यात मिळत असे. एकदा कोनाड्यातला नारळ पाहून दादा कृद्ध झाले. त्यांनी नारळ फेकून दिला. पुन्हा पाहतात तर दुसरा नारळ तिथे दिसला. तो ही फेकला तर तिसरा, चवथा, पाचवा असा बघता बघता नारळांचा ढीग जमला. दादांनी जानकीपुढे शरणागती पत्करली. नारळ मोजून पाहिले तर बरोबर एक हजार होते. दादांनी जानकीची क्षमा मागितली आणि आदिशक्तीला वंदन केले.
जानकी आता दीन-दु:खितांचे अश्रू पुसू लागली. ती सुशिक्षित नव्हती तरी तिला सर्व भाषा अवगत होत्या. ओव्या, भजने, अभंग हे ती नित्यनियमाने गात असे. देवी-देवतांची सुंदर वर्णनपर गीते जानकी झोपाळ्यावर बसून जेव्हा गात असे त्यावेळी तिथे उपस्थित असणार्यांना तिच्या जागी प्रत्यक्ष दुर्गा भवानी दिसत असे. तिची नखशिखांत सुंदरता, भव्यता आणि तेज पाहून डोळे दिपून जात.
एकदा गणदेवी गावात प्लेगची साथ आली. पटापट माणसे मृत्युमुखी पडू लागली. सगळीकडे आकांत पसरला. गाव खाली करुन माणसे जंगलात पळू लागली. जानकीने स्वत: गावात फिरुन रोग्यांची सेवा केली. आपले सर्व सामर्थ्य पणाला लावून रोगाचे उच्चाटन केले. शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच रोगाला सीमेवर रोखले.
आता लोक जानकीचा जयजयकार करु लागले. अनेकांना जीवनदान मिळाले. मुखाने ओव्या गात जानकीने गोष्टी सांगत सांगत अनेक साधुसंतांची दर्शने घडवली. ज्याला सर्वत्र ईश्वर दिसतो तो कधी प्रेमात अंतर करीत नाही. त्याला मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी सर्व सारखेच असतात. जानकी आईही अशीच परमेश्वर स्वरुप साध्वी होती. तिने कळत नकळत असंख्य चमत्कार केले. आपल्यातील दिव्यत्वाची प्रचिती दिली आणि या सिद्धिचा उपयोग मात्र सदैव जनकल्याणार्थ केला.
जानकी आईने १९४६ साली चैत्र नवमीला, रामनवमीच्या शुभदिनी भरदुपारी कैलासगमन गेले. ही तिथी आणि वेळ तिने एक वर्षभर आधीच पंचांगात लिहून ठेवली होती. आज जानकी आई जरी देहाने आपल्यात नसली तरी ती चराचरात वास्तव्य करुन आहे. तिचा कृपा कटाक्ष भक्तांवर सदैव आहे आणि त्याची प्रचिती वेळोवेळी येतच असते.
जानकी आईचे पद्यरुपी जीवनचरित्र म्हणजेच “सावली” ही पोथी आपल्याला सदैव प्रेमाची सावली देतच असते.
Leave a Reply